जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कुडाळ (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन नारूर येथील रांगणा गडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे सहदेव पाटकर, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या फिजा मकानदार, नासिर मकानदार, सलील, विशाल कांबळे, फातिमा मकानदार, समिल नाईक व युसूफ शेख उपस्थित होते.

कार्यक्रमांतर्गत बीजरोपण व वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक सहभागीने तीन रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्षारोपण करताना प्रत्येक झाडाचे
पर्यावरणीय महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

यावेळी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि भविष्यातील आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान सलील आणि विशाल यांनी विविध झाडांची ओळख करून देत त्यांचे उपयोग व संवर्धनाची आवश्यकता स्पष्ट केली.तसेच युवकांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येतील, यावरही संवाद साधण्यात आला. जयराम जाधव यांनी विविध कृषी योजनांची माहिती देऊन गावागावांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास सर्व उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी पी. डी.शिरसाठ आणि मंदार गावडे यांनी रोपे व बियाणे उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.

error: Content is protected !!