हरवलेल्या युवकाचा शोध घेत खेळाडूंनी जपली सामाजिक बांधिलकी
कणकवली (प्रतिनिधी) : क्रिकेट हा केवळ खेळ नसून समाजातील माणुसकी, मैत्री आणि एकोप्याचे प्रतीक असल्याचे प्रत्यंतर सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी नुकतेच घडवून आणलेल्या एका घटनेतून दिसून आले. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावातील एक युवक ‘बहिणीकडे जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. संबंधित युवकाची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तो कुडाळ तालुक्यातील नेरूर येथून कोणालाही न कळवता निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शोधासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू झाले. या शोधमोहीमेत सावंतवाडीतील टेनिस क्रिकेट खेळाडू हेमंत नेमळेकर, सचिन नेमळेकर, गोट्या कदम आणि मोतीराम जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. युवक कणकवली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील युवकांनीही तातडीने मदतीचा हात पुढे केला. कणकवली तालुक्यातील युवा खेळाडू अनिकेत कांबळे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्यासोबत हेमंत कांबळे आणि पवार सर यांनीही मार्गदर्शन व मदत केली. तसेच समाजकार्यात अग्रेसर असलेले माजी नगरसेवक गौतम खुडकर, अक्षय तांबे आणि वैभव किंजवडेकर यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संबंधित युवक सुरक्षितपणे सापडला असून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे क्रिकेटमुळे निर्माण झालेली मैत्री आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. क्रिकेटविश्वातील खेळाडू आणि मित्रपरिवाराने दाखविलेली ही समाजभावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.














