वैभववाडीत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलन
शासन पुरस्कार प्राप्त महेश संसारे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : नैसर्गिक शेतीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला असून पर्यावरण सुधारण्याची मोठी ताकद या शेतीपद्धतीमध्ये आहे. देशी गाय हा नैसर्गिक शेतीचा प्रमुख पाया आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूसाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र उभारण्यात आल्यास शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सुटू शकतात, असे प्रतिपादन किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास सावंत यांनी केले.भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग यांच्या वतीने वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित ‘प्राकृतिक नैसर्गिक शेती संमेलन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा पदाधिकारी संतोष कानडे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, महीला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, जि. प. सदस्य रिध्दी सुतार, श्रावणी रावराणे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, देवानंद पालांडे, साधना नकाशे, सुवर्णा संसारे, शारदा कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, शासनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे. सेंद्रिय शेती सध्या आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते तसेच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो.
कोकणातील बहुतांश फळे व कृषी उत्पादने नैसर्गिक स्वरूपाची असली तरी ती स्वतःच्या ब्रँडखाली विकली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेले मानधन स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी “घर तिथे गाय, घर तिथे गोठा” हे समीकरण प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारले पाहिजे, असे आवाहन केले.
रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या नावांवरून सुरू असलेल्या वादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, देवगडचा बॉक्स वापरून इतरत्र उत्पादित आंब्यांची विक्री होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही आंब्याची लागवड वाढत असल्याने भविष्यात राष्ट्रीय संशोधन केंद्र कोकणाबाहेर जाण्याची भीती असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
नवीन पिढी शेतीकडे वळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी तरुणांना शेतीची ओळख करून देण्याची गरज अधोरेखित केली. “तुमची शेती कुठे आहे, तिची हद्द काय आहे, याची माहिती नव्या पिढीला असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सन्मानाने जगत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांची मदत मिळत आहे. स्वच्छता अभियानाप्रमाणेच नैसर्गिक शेतीही लोकचळवळ बनली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे आणि सभापती सिद्धेश रावराणे यांनीही मनोगत व्यक्त केले. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त महेश संसारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेश संसारे यांनी केले.












