वीज समस्यांवर १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होणे, एलटी व एसटी लाईनवरील झाडांच्या फांद्या, धोकादायक स्थितीतील वीज खांब तसेच खराब झालेल्या तारांमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आज तरंदळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कणकवली कार्यालयावर धडक दिली.
ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे सहाय्यक अभियंता भामरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी गावातील एलटी आणि एसटी लाईनवरील झाडांची तातडीने छाटणी करणे, पडण्याच्या स्थितीत असलेले वीज खांब बदलणे, जळालेल्या व खराब झालेल्या तारांची दुरुस्ती करणे तसेच लाईन लिंक करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
चर्चेनंतर सहाय्यक अभियंता भामरे यांनी सर्व तक्रारींची लवकरच पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. तसेच येत्या १५ दिवसांत झाडांची छाटणी व वीज खांब दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात सरपंच सुशिल कदम, ग्राम शालेय शिक्षण व सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे, ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत, देवा रावले, अमित सावंत, किरण सामंत, राजाराम सावंत, अमोल गावकर आणि ओमकार सावंत सहभागी झाले होते.
गावातील वीज समस्यांबाबत ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच सुशिल कदम यांनी दिला.









