अन्यथा स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषणाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतीच्या नळ व पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार दरमहा १३ हजार वेतन देण्यात यावे, तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे. १० ऑगस्ट पर्यंत या मागण्यांची पूर्तता न केल्यास १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नळ व पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अत्यल्प वेतनावर अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. सध्या त्यांना मिळणारे वेतन हे किमान वेतन कायद्याने निश्चित केलेल्या दरापेक्षा खूपच कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही याबाबत निवेदने देऊन प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी वेतनात केवळ अल्प वाढ करण्यात आली असून ती देखील कायद्यानुसार अपेक्षित वेतनापेक्षा कमी असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार नगरपंचायतीतील कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे किमान वेतन निश्चित करण्यात आलेले असतानाही पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना त्यानुसार वेतन दिले जात नसल्याने हा कामगार कायद्याचा भंग असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. २४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सध्याच्या महागाईच्या काळात अत्यंत कठीण झाला असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार थकबाकीसह वेतन लागू करावे, पावसाळी किट उपलब्ध करून द्यावेत, नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि त्यांच्या जीवन विम्याची व्यवस्था करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या मागण्यांवर १० जुलै २०२६ पूर्वी सकारात्मक निर्णय न झाल्यास १५ जुलै २०२६ रोजी कणकवली नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.









