मागासवर्गीय शिक्षकाला अश्लाघ्य शब्द वापरणाऱ्या कणकवली प्रांताधिकारी यांचा तीव्र निषेध;

चर्मकार समाज उन्नती मंडळाने केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली प्रांताधिकारी यांनी देवगड तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षक जयेंद्र गणपत चव्हाण यांचेशी अश्लाघ्य शब्दात केलेल्या वर्तनाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांनी आक्रमक होत प्रांत जगदीश कातकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. श्री.कातकर यांचेवर चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी करत सोमवारी होणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनास सक्रीय पाठिंबा दर्शविला आहे.

२५ जून २०२६ रोजी तहसीलदार देवगड यांनी BLO यांचे SIR संदर्भातील प्रशिक्षण आयोजित केलेले होते. त्यानुसार सकाळ सत्रात शाळा चालवून शिक्षक १० वाजता प्रशिक्षण स्थळी पोहोचले होते. प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रांताधिकारी ११ वाजता आल्यावर सुरू झाले. प्रशिक्षण सव्वा दोन वाजेपर्यंत चालूच होते व संपण्याचीही काही चिन्हे नव्हती. अशा वेळी शिक्षक श्री.चव्हाण यांनी त्यांची कैफीयत मांडताना आपण वेळे अभावी नाष्टा वगैरे केलेला नसल्याने भुकेने व्याकुळ झाल्याने प्रशिक्षणास बसणे शक्य नाही. थोडा विराम द्यावा अशी विनंती केली. असे सांगत असतानाच त्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून न घेताच “तू जायला लाग..जा तू…जायला लाग…हरामखोर…कोण आहे हा? याचा सुपरवायजर कोण? याची सस्पेंड ची ऑर्डर काढा..” असे अर्वाच्च भाषेत बोलले. हरामखोर या शब्दावर त्यांनी त्याचवेळी आक्षेप घेतला तरी श्री.कातकर हे त्याच अश्लाघ्य भाषेत बोलत राहिले. तशाच परिस्थितीत त्यांनी प्रशिक्षण सव्वा तीनच्या सुमारास पूर्ण केले. त्यानंतर प्रशिक्षणतील शिक्षक यांनी प्रांताधिकारी यांनी उच्चारलेल्या शब्दावर आक्षेप घेतला. त्यावर “मला या विषयावर चर्चा करायची नाही. तुम्हाला कोठे तक्रार करायची तिकडे करा. ’’अशी हेकेखोर भाषा वापरली.झालेल्या या प्रकाराने समस्त शिक्षक वर्गाचे मन दुखावले गेले आहेच त्याच बरोबर प्रांताधिकारी यांचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे ही समजून आले आहे. त्यांच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे समाजाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!