अमॅच्यूअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड

सहसचिवपदी महाराष्ट्राच्या भारती जगताप विराजमान

तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अर्थात अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (ए.के.एफ.आय)ची सन.२०२६-२०३० या आगामी चार वर्षांच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथे पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी महाराष्ट्राचे पुनीत बालन यांची, तर सरचिटणीस पदावर तेलंगणाचे ए. उशी रेड्डी आणि कोषाध्यक्षपदी झारखंडचे संजय कुमार झा यांची रीतसर आणि बिनविरोध निवड झाली आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा (निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश) आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी पंकज श्रीवास्तव (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) यांच्या देखरेखीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली.

(कबड्डीच्या विकासाला मिळणार नवीन दिशा….)

नवीन समितीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत देशात तळागाळातील कबड्डीला प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करणे, खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून देणे आणि विविध राज्य संघटनांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे यावर सविस्तर चर्चा झाली. यासोबतच आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांची तयारी आणि संघटनेचा विस्तार या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, या नवीन समितीमुळे येत्या काही वर्षांत भारतातील कबड्डीच्या विकासाला एक नवी आणि आधुनिक दिशा मिळेल.

(नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारी समिती)

नव्या कार्यकारिणीत १० उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये चितला उपेंद्र रेड्डी (तेलंगणा), अरविंद कुमार पात्री (ओडिशा), ताशी ऑगडुप लेपचा (सिक्कीम), आनंद सिंग (हिमाचल प्रदेश), तैबुर रहमान (पश्चिम बंगाल), अभिषेक राठी (उत्तर प्रदेश), शाहनवाज उद्दीन शेख (मध्य प्रदेश), के. सुरेश (गोवा), डोंगचे पीटर (अरुणाचल प्रदेश) आणि एन. तमिलरासन (पुडुचेरी) यांचा समावेश आहे. तसेच सहसचिव पदावर महाराष्ट्राच्या भारती अनिल जगताप आणि विदर्भाचे प्रदीपसिंह ठाकूर यांच्यासह डॉ. बसंत आंचल (छत्तीसगड), पलक सोंदरवा (गुजरात), सुनील सोनू दहिया (दिल्ली), राम बाबू (हरियाणा), जगदीप सिंग (पंजाब), प्रवीण कुमार (उत्तराखंड), डॉ. आर. मणी मारन (तामिळनाडू) व शैनेश सिद्धन पुल्लानी (केरळ) यांची निवड झाली आहे. कार्यकारी समितीमध्ये कर्नाटक, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, लडाख, जम्मू आणि काश्मीरसह विविध राज्यांच्या १६ प्रतिनिधींना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

(ए.के.एफ.आय च्या तांत्रिक सचिवपदी साताराचे ज्ञानेश काळे यांची निवड)

एकेएफआयच्या तांत्रिक समिती सचिव म्हणून महाराष्ट्र सातारचे ज्ञानेश काळे, तर महिला शिस्तपालन समितीच्या चेअरमनपदी सपना वाघमोडे आणि महिला पंचमंडळ सचिवपदी सुधा ढवळे यांची निवड झाली आहे. या ऐतिहासिक बैठकीला प्रा.अरुण सिंग, डॉ. राजेश गुप्ता, विवेक रेड्डी यांच्यासह विविध राज्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कुमार यांनी केले, तर नवनिर्वाचित कोषाध्यक्ष संजय कुमार झा यांनी आभार मानले. देशातील सर्व क्रीडाप्रेमी आणि संलग्न संघटनांनी नवनिर्वाचित समितीचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील अध्यक्षासह अन्य पाच जनांची राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून निवड झाल्याने महाराष्ट्रात कबड्डीसाठी वेगळी दिशा मिळणार आहे.

२६/६/२०२६

अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस उशी रेड्डी, महाराष्ट्रातील पदाधिकारी राष्ट्रीय सहसचिव भारती जगताप व ज्ञानेश काळे, सपना वाघमोडे,सुधा ढवळे, प्रतापसिंह ठाकुर,

error: Content is protected !!