डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

60 रक्तदात्यांनी केले रक्तदान ; डीवायएसपी कार्यालय आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान कणकवलीचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : “रक्ताचा तुटवडा असल्याचे समजले आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, या हेतूने सेवा निवृत्तीपूर्वी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला,” व त्यामध्ये मी रक्तदान देखील केले आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे प्रतिपादन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कणकवली आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आढाव यांच्या सेवा निवृत्ती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कणकवली येथे करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर विद्याधर तायशेटे, डॉक्टर सर्वेश तायशेटे डॉक्टर समीरा रावराणे, सिंधुरत्न रक्तमित्र प्रतिष्ठान मकरंद सावंत, सुशील परब, विनू महाडिक, स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा सिंधुदुर्गनगरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, आचरा पी.आय. प्रदीप पोवर, विजयदुर्ग ए.पी.आय संजय कातिवले उपस्थित होते.

या उपक्रमाला पोलीस अधीक्षक मोहन दहिकर तसेच पोलीस उपअधीक्षक नयोमी साटम यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. रक्तदानासह आरोग्य तपासणीसारखे उपक्रम पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शिबिराला पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच त्यांच्या नातेवाईकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 60 जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली, तर 56 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची शुगर, ब्लड प्रेशर, इसीजी, थायरॉईड यांसारख्या वेगवेगळ्या मोफत वैद्यकीय तपासन्या करण्यात आल्या. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना सोनचाफ्याचे रोप व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही समाजहिताचा विचार करून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, अशा सामाजिक उपक्रमांतून पोलीस दलाचा समाजाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध पुन्हा अधोरेखित झाला.

error: Content is protected !!