एलसीबी जोमात आणि स्थानिक पोलीस कोमात

मटका बुकी स्थानिक पोलिसांना दिसत नाहीत काय ?

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एल.सी.बी सिंधुदुर्ग ने कणकवली, देवगड आणि लागोपाठ कुडाळ मध्ये मटका बुकीवर कारवाई केली आहे. ओरोस हुन कार्यरत असणाऱ्या एल.सी.बी च्या पथकाला मटका बुकी दिसतात तर त्या तालुक्यातील तालुका पोलीस ठाणे आणि दुरक्षेत्र मध्ये स्थानिक पोलिसांना मटका बुकी दिसत नाहीत काय ? की दिसूनही अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जातेय असा सवाल आता नागरिकांतून व्यक्त होतोय. कणकवली शहरात गांगोमंदिर नजीक टेम्बवाडी रस्त्यावर बागवे याला एल.सी.बी ने मटका घेताना पकडले. बॅक टू बॅक देवगड आणि कुडाळ शहरात देखील एलसीबी ने मटका बुकिंवर कारवाई केली. जर ओरोस हुन येऊन एल.सी.बी चे पथक मटका बुकींवर कारवाई करते तर जिल्ह्यातील आठही तालुक्यातील स्थानिक पोलीस मटका बुकिंकडे दुर्लक्ष का करतायत ? केवळ नावाला दाखवण्यापुरती एखाद दुसरी कारवाई दोन किंवा तीन महिन्या आड करायची आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या कारवाई चे आकडे देण्याचे सोपस्कार स्थानिक पोलीस का करताहेत ? मटका जुगार तसेच अवैध धंद्याबाबत पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणेंची भूमिका जगजाहीर आहे. दोन नंबरचे धंदे नाही म्हणजे नाहीच हे राणे बंधूनी अगदी ठणकावून सांगितले आहे. आमदार निलेश राणेंनी तर प्रेस कॉन्फरन्स घेऊनच पोलीस यंत्रणेच्या झारीतील शुक्राचार्यांचे बुरखे टराटरा फाडले. मात्र त्यानंतरही खडबडून जागे झालेल्या (की आव आणलेल्या) खाकी ने कारवाया सुरू केल्या. त्यांनंतर मागील काही दिवस जसे पावसाने दडी मारली होती तशीच पोलिसांच्या कारवायांनी सुद्धा दडी मारलेली. ज्या काही जुजबी कारवाया झाल्या त्याने जर पोलीस दल शेखी मिरवत असेल तर दरदिवशी होणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाईचे सातत्य दर दिवशी का नाही ठेवले ? जिल्ह्यातील आठही तालुका शहर ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि काही विशेष अंमलदारांना आपल्या शहरात कुठल्या स्टॉलवर कोण मटका घेतो हे सगळं बित्तंबातमी खबर असते. तीच स्थिती पोलीस दुरक्षेत्र क्षेत्रातही लागू आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतलेली कडक भूमिका आणि आमदार निलेश राणेंच्या प्रेस कॉन्फरन्स मधील इशाऱ्यानंतर ही सुरू असलेल्या मटका जुगार लिकर सप्लाय बेकायदेशीर वाळू वाहतूक, अंमली पदार्थ आदी अवैध धंद्यांतून जसे दोन नंबरवाले गब्बर होतायत तसेच काही ठराविक कायद्याच्या रक्षकांचे सुद्धा उखळ पांढरे होतेय हे कोणीच नाकारू शकत नाही. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय कुठेच मटका जुगार अंमली पदार्थ वाहतूक सारखे दोन नंबर धंदे होऊच शकत नाहीत. जर स्थानिक पोलीस दक्ष राहतील तर एलसीबी ला कारवाई करायची वेळच येणार नाही.

error: Content is protected !!