दोडामार्ग येणार जगाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर – बाबा मोंडकर..!

तिलारी खोऱ्यात साकारणार भव्य ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’

आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्याला यश; ‘बारमाही पर्यटनाला’ मिळणार नवी दिशा मिळणार आहे

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विशेषतः दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक गती देणारी बातमी असून मुंबईतील प्रसिद्ध ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ आणि गुजरातच्या जगप्रसिद्ध ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता दोडामार्ग येथील तिलारी खोऱ्यात भव्य राष्ट्रीय उद्यान साकारणार आहे. आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. तिलारी परिसरात हे राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असल्याचे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, या उद्यानाला ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’ असे नाव देण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी आनंद व्यक्त केला असून, “या प्रकल्पामुळे आता दोडामार्ग तालुका थेट जगाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या उदयानामुळे दोडामार्गचा चेहरामोहरा बदलणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित अँमेझोन येथिल निसर्ग जैवविविधता जागतिक पातळीवर पोचणार असून रोजगाराची प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. वनमंत्र्यांच्या या घोषणेनंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दोडामार्ग तालुक्याला निसर्गाने भरभरून वैभव दिले आहे. आमदार प्रमोद जठार यांनी अधिवेशनात केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्र्यांच्या मंजुरीमुळे दोडामार्गच्या शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे राष्ट्रीय उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार असल्याने, जगभरातील पर्यटकांची पावले आता दोडामार्गकडे वळतील आणि हा परिसर जागतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनेल.”

‘सिंधुदुर्गचे अ‍ॅमेझॉन’ आणि बारमाही पर्यटनाला नवी दिशा विस्तीर्ण वनक्षेत्र आणि दाट जैवविविधतेमुळे तिलारी खोऱ्याला ‘सिंधुदुर्गचे अ‍ॅमेझॉन’ म्हणून ओळखले जाते. हा परिसर ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून प्रसिद्ध असून येथे नैसर्गिकरीत्या सिंह वगळता सर्व वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. कोकणातील पर्यटन सहसा ठराविक हंगामापुरते मर्यादित असते, मात्र या राष्ट्रीय उद्यानामुळे आणि इथे सुरू होणाऱ्या जंगल सफारीमुळे सिंधुदुर्गातील ‘बारमाही पर्यटनाला’ (Year-round Tourism) मोठी दिशा मिळणार आहे.

या राष्ट्रीय उद्यानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे : आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान: मोपा विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर हे उद्यान असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना थेट आकर्षित करणे सोपे होईल, ज्यामुळे दोडामार्ग जागतिक स्तरावर हायलाइट होईल. वनतारा पॅटर्नवर संवर्धन: गुजरातच्या ‘वनतारा’ प्रकल्पाप्रमाणेच या उद्यानात वन्यजीवांचे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे संरक्षण व संवर्धन केले जाईल. जंगल सफारीचा थरार: पर्यटकांसाठी खास ‘जंगल सफारी’ सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे पर्यटनाला व्यावसायिक गती मिळेल. स्थानिक रोजगार आणि व्यवसाय: हॉटेल, ट्रॅव्हल्स, गाईड्स आणि स्थानिक उत्पादने विकणाऱ्या लघुउद्योजकांसाठी बारमाही व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या हजारो नव्या संधी उपलब्ध होतील. आमदार प्रमोद जठार यांचा पुढाकार, वनमंत्र्यांची मंजुरी आणि विष्णू मोंडकर यांच्यासह सर्व स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केलेला विश्वास यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणारा ठरेल. यासाठी आमदार प्रमोद जठार तसेच वनमंत्री गणेश नाईक यांचे तसेच राज्य सरकारचे आभार पर्यटन व्यावसायिक महासंघ मानत आहे.

error: Content is protected !!