बांदा (प्रतिनिधी) : लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर फार मोठा परिणाम होतो. लोकसंख्या वाढीमुळे अन्न, पाणी, जमीन आणि ऊर्जेची मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे अनिर्बंध जंगलतोड, प्रदूषण आणि वेगाने कमी होणारी जैवविविधता यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. मानवी वस्त्या, शेती आणि उद्योगांसाठी जमिनीचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे भूजलाची पातळी खालावत असून नैसर्गिक जलस्रोतांवर प्रचंड ताण येत आहे. शेतीयोग्य जमीन आणि राहण्यासाठी जागा निर्माण करण्याच्या नादात जंगले नष्ट केली जात आहेत. अधिवास नष्ट झाल्यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. लोकसंख्या नियंत्रणाची गरज ही देशाच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी आणि निवारा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो. योग्य कुटुंब नियोजनामुळे माता व बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते आणि गरिबी, बेरोजगारी कमी होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते असे या प्रसंगी डॉ. गोविंद काजरेकर प्रतिपादन केले.
याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी जागतिक लोकसंख्येचा आढावा घेतला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी काजरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रश्मी काजरेकर यांनी केले. यामध्ये महाविद्यालयातील विविध वर्गातील आठ गटांनी सहभाग घेतला. यामध्ये वैदवी विलास मांजरेकर आणि अमोल अनिल सावंत यांच्या गटाने प्रथम क्रमांक, सानिका तुकाराम हरमलकर आणि वैष्णवी गणपत परब यांच्या गटाने द्वितीय क्रमांक, तसेच शर्वा संतोष मोरजकर आणि विश्वरी विठ्ठल ठिकार यांच्या गटाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या व सहभागी गटांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दत्तगुरु जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रा. निरंजन आरोंदेकर यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका संपदा शिंदे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.












