58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात कनेडी हायस्कूलचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक

ओराेस (प्रतिनिधी) : 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने ओराेस येथे दि. 1 ते 10 जुलै या कालावधीत वार्षिक संयुक्त प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 400 एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिस्त, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र हाताळणी, सामाजिक उपक्रम, विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी शिबिर गाजले.या शिबिरात कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 25 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. संस्थेचे एएनओ गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग घेतला.

शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट नृत्य व सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या शिबिराचे प्रमुख कर्नल अजय राज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले.

कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच एएनओ गुरव सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!