चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण 9 ऑक्टोबर 2019 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर वर्षभराने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळातला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसद पटू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दिवंगत बॅ नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून केंद्र सरकारने या नावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. तशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला थोर स्वातंत्र्य सेनानी बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसद पटू म्हणून आपला ठसा देश पातळीवर उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ नाथ पै यांचे नाव देऊन आपल्या भूमिपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना शक्य होईल. याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने केला असून १ फेब्रुवारी 2023 रोजी तो केंद्र सरकारकडे देखील पाठविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व संसद रत्न प्राप्त सुप्रिया सुळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सुरू ठेवलेला आहे. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून आपण केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करत चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सरचिटणीस भास्कर परब, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओठवणेकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!