घोणसरी ग्रामपंचायतची ‘सोलर व्हिलेज’ कडे वाटचाल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत एक आदर्श पाऊल उचलले आहे. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून गावातील सर्व शासकीय इमारती -ग्रामपंचायत कार्यालय,गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.यामुळे सर्व शासकीय इमारतींचे सरासरी वार्षिक एकत्रित बिल रक्कम 72हजार ची बचत होणार आहे.तसेच ग्रामपंचायतीची मुख्य नळ योजना 6 KW सौर ऊर्जेवर करण्यात आल्याने पाणी पुरवठ्यासाठी येणाऱ्या मोठ्या वीज बिलापासून दिलासा मिळाला आहे.यातून वार्षिक 2लाख 40हजार रुपयांची बचत होणार आहे.

तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सामाजिक सुरक्षा या मुद्द्याच्या अनुषंगाने गावाच्या सुरक्षेसाठी बसवलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे सुद्धा सौर ऊर्जेवर जोडण्यात आले आहेत. त्यामुळे वीज नसली तरीही यंत्रणा २४ तास कार्यान्वित राहणार आहे.यातून अंदाजे 10हजार ची बचत होणार आहे.
याचबरोबर गावातील ग्रामपंचायत कार्यालय पासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथ दिवे (स्ट्रीट लाईट),तसेच स्मशान भूमींमधील दिवे सौर ऊर्जेवर बसविण्यात आले आहे.ज्यामुळे वार्षिक 40 हजार रुपयांची बचत होणार आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायतीची सरासरी एकूण 3 लाख 62 हजार रुपयांची वार्षिक बचत होणार असून हा निधी गावामध्ये विविध विकास कामांना वापरता येणार आहे.ज्यामुळे गावाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे होत आहे. निसर्गाचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून सरपंच प्रसाद राणे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी यांनी या उपक्रमांसाठी विशेष मेहनत घेतली.ग्रामपंचायत घोणसरीने केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!