महिलांच्या कार्याचा सत्कार आणि त्यातून प्रेरणा– यासाठी हा गौरव दिवस !- तन्वी मोदी
फोंडा ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनासाठी महिलांची अभूतपूर्व उपस्थिती !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महिलांच्या हक्कासाठी, आंतरराष्ट्रीय महिला चळवळीने १९७७ साली अधिकृत मान्यता दिली.आणि ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे. हा दिवस महिला वरील अत्याचार विरोधी लढा आणि त्यांच्या प्रगतीचा गौरव करणार आहे. एक महिला दुसऱ्या महिलेची वैरी न बनता,सखी म्हणून सक्षमपणे उभी राहिली, तर आजचा समाज स्त्री रक्षणासाठी सदैव तत्पर राही. महिलांचा सन्मान करेल. असे उद्गार फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे यांनी काढले.
त्या फोंडाघाट येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या विविध रंगी कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य, ज्येष्ठ ग्रामस्थ महिला प्रमिला सापळे, वत्सला सामंत श्यामल म्हाडगुत व स्नेहलता राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या . शुभारंभ दीप प्रज्वलन करून आणि गणेश पूजन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.सोहळ्याचे प्रास्ताविक- स्वागत मनीषा चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन शशिकला शितोळे यांनी केले.
यावेळी आपापल्या विभागात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या, गावातील महिला मनीषा जाधव, तन्वी संतोष पारकर, मनस्या फाले ,सुचिता चंद्रकांत शिरोडकर, धनश्री नेवगी,गीता सामंत यांचा मान्यवरांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहलता राणे ,शामल म्हाडगूत यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. जगदीश राणे यांनी आरोग्य शिबिराचे मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमात गावातील महिला, युवती, संसारमग्न गृहिणी आणि मुलींनी आपापल्यातील कलागुणांना व्यासपीठाचा आस्वाद घेत, वाट करून दिली. आणि उपस्थित भरगच्च प्रेक्षागृहातील महिला अबाल वृद्धांची दाद मिळविली.
समारोपीय भाषणात, आपल्या आयुष्यात विविधांगी भूमिका बजावताना,महिला आपल्या कुटुंबाला प्रेम, माया, शक्ती, प्रेरणा, मेहनत, कष्ट आणि कर्तुत्व,त्यागाला सामोरे जाताना वात्सल्य,मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्वाचे दर्शन देतात तर कधी रणरागिणीचे ! तिच्या कार्याचे कौतुक करण्याचा, सलाम करण्याचा आजचा दिवस ! आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे.असे विचार उपसरपंच सौ. तन्वी मोदी यांनी व्यक्त केले. यावेळी आशासेविका, अंगणवाडीसेविका, सीआरपी, तसेच शाळा कॉलेजमधील मुली- युवती आणि गावातील महिलांनी या सोहळ्याला अभूतपूर्व उपस्थिती लावली…













