कणकवली बस स्थानकात स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने महिला, जेष्ठ नागरिक, अमृत जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत योजना सुरू केली आहे. मात्र यासाठी पात्र प्रवाशांना आधारकार्ड ऐवजी आता स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन अनिवार्य केले आहे. कणकवली एसटी बस स्थानकात सुरू झालेल्या स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन चा फायदा लाभार्थी प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. कणकवली एसटी बस स्थानकातील स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन सेवेचे उदघाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते नगरसेवक जयेश धुमाळे, बसस्थानक प्रमुख श्रीनिवास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून करण्यात आले. यावेळी स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन कणकवली प्रतिनिधी रुपेश जाधव, एसटी कर्मचारी श्री. बोभाटे, पावसकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की, एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के तसेच जेष्ठ नागरिकानाही एसटी तिकीट दरात सवलत दिली जाते. तसेच अमृत जेष्ठ नागरिकांना पूर्ण प्रवास मोफतची सुविधा आहे. या सुविधेचा लाभ प्रवाशांना यापूर्वी आधारकार्ड वर मिळत होता. परंतु राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता महिला प्रवासी, तसेच जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. स्मार्ट कार्ड शिवाय यापुढे एसटी प्रवासात मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी प्रवाशांनी स्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशन करावे. आभार रुपेश जाधव यांनी मानले.












