वेंगुर्लेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त लक्ष्मी मांजरेकर यांचा सत्कार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : बदलत्या आधुनिक काळातही गावठी औषधांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या वेंगुर्ला येथील लक्ष्मी पांडुरंग मांजरेकर यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आधुनिक आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल झाले असले तरी काही आजारांवर पारंपरिक गावठी औषधांचा आजही उपयोग होत असल्याचे दिसून येते. गेली सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ लक्ष्मी मांजरेकर विविध रानौषधींच्या आधारे रुग्णांना उपचार देत आहेत. नागीण, धावरा, कांजिण्या, गोवर तसेच टाळू (माथ्यावरील आजार) यांसारख्या विकारांवर त्या औषधे देऊन अनेकांना दिलासा देत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहूनही अनेक रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात. त्यांच्या औषधांनी अनेकांना तीन दिवसांत गुण पडल्याचे अनुभव रुग्णांकडून व्यक्त करण्यात येतात. वयोमानानुसार आता त्यांना स्वतः रानात जाऊन औषधी वनस्पती गोळा करणे शक्य नसले तरी इतरांच्या मदतीने औषधे आणून घेऊन त्या आपली सेवा आजही अखंड सुरू ठेवत आहेत.

महिला दिनाचे औचित्य साधून समाजासाठी दिलेल्या या निस्वार्थ सेवेसाठी वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व झाड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महीला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, नगरसेवीका शितल आंगचेकर, माजी सभापती सारीका काळसेकर व अंकीता देसाई उपस्थित होत्या. उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बदलत्या काळातही परंपरागत ज्ञान जपत रुग्णसेवा करणाऱ्या लक्ष्मी पांडुरंग मांजरेकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!