सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थिक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच. याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील आंबा काजू बागायतदार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना मशागत, औषध फवारणी मजूरी अशा अनेक मशागतीच्या कामासाठी एक हेक्टरसाठी सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च येतो आणि शेवटी जीवापाड मेहनतीच्या जोरावर पिक हातात यायच्या मोसमात हवामानाच्या बदलत्या अस्मानी संकटामुळे कोंकणातील बागायतदार शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागतो आणि कर्जबाजारी होतो आहे. यावर्षी ९५ % बागांच्या पिकांचे नुकसान झाले असून अशा बाधीत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई फक्त जाहीर न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मागणी केली असुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ मार्च रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे,या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी १२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.
बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष अमित सामंत












