जागतिक पर्यटन दिनी ‘VM Travel Mart’चे विनामूल्य वेब पोर्टल सुरू
AI आणि डिजिटल माध्यमातून पर्यटन व्यवसायाला जागतिक व्यासपीठ देण्याचा पर्यटन महासंघाचा प्रयत्न – बाबा मोंडकर
आचरा (प्रतिनिधी) : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यंदा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेने जाहीर केलेल्या “Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism” या संकल्पनेनुसार कोकणातील पर्यटनाला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने https://vmtravelmart.in हे विशेष वेब पोर्टल सुरू करण्यात येत असून, त्याद्वारे सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसायाला डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोकणात समृद्ध जैवविविधता, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे व किल्ले, मालवणी खाद्यसंस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवनाचा वारसा आहे. त्यामुळे गोव्याला पर्याय म्हणून कोकणाकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी संधी आहे. आजचा पर्यटक प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी मोबाईल, डिजिटल नकाशे, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती घेतो. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी डिजिटल आणि AI-साक्षर होणे ही काळाची गरज बनली आहे.
२ हजारांहून अधिक पर्यटन व्यावसायिकांना जोडणार
या वेब पोर्टलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २,००० पेक्षा अधिक हॉटेल, लॉजिंग, होमस्टे, अॅग्रो-टुरिझम तसेच लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिकांना एका डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन आहे. देश-विदेशातील पर्यटकांना सिंधुदुर्ग व कोकणातील पर्यटनस्थळे, निवासव्यवस्था, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक पर्यटन सेवांची माहिती एकाच ठिकाणी विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
पर्यटन व्यावसायिकांना पोर्टलवर मोफत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना अडचण येणाऱ्या व्यावसायिकांसाठीही महासंघाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. व्यावसायिकांनी 82751 06375 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या व्यवसायाचे नाव पाठवावे. त्यानंतर महासंघाचे प्रतिनिधी संपर्क साधून नोंदणीची प्रक्रिया विनामूल्य पूर्ण करून देतील.
कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि AIचीही साथ
कोकणातील अनेक अपरिचित पर्यटनस्थळे मुंबई, पुण्यासह देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात सोशल मीडिया, रील्स आणि यूट्यूबवरील कंटेंट क्रिएटर्सची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या क्षेत्रातील संस्था, व्यक्ती, कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांना एकत्र आणून स्थानिक होमस्टे, खाद्यव्यवसाय तसेच छोट्या पर्यटन व्यावसायिकांना डिजिटल प्रमोशनचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन महासंघाकडून करण्यात येत आहे.
केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांचे प्रमोशन न करता मालवणी खाद्यसंस्कृती, दशावतार लोककला, आंबा-काजू बागा, पारंपरिक जीवनपद्धती आणि निसर्गानुभव AIच्या मदतीने विविध भाषांमध्ये पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
‘AI + स्थानिक ज्ञान’चा नवा प्रयोग
AIच्या सहाय्याने स्थानिक युवकांना ‘डिजिटल टुरिझम गाईड’ म्हणून काम करण्याची संधी निर्माण होऊ शकते. AI हे मानवाची जागा घेण्यासाठी नसून काम अधिक वेगवान, अचूक आणि प्रभावी करण्याचे साधन आहे, या भूमिकेतून पर्यटन संचालन कोकण विभागाच्या समन्वयाने महासंघ काम करणार आहे.
पर्यटनाचा विस्तार करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यटन वाढीसोबत स्थानिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, मार्गदर्शक प्रणाली आणि पर्यटन शिस्त यावरही स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर काम करण्याचा महासंघाचा प्रयत्न असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी दिली.
सिंधुदुर्गला ‘AI जिल्हा’ बनविण्याच्या दिशेनेही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून, पर्यटन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास कोकणातील स्थानिक पर्यटन व्यवसायांना देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.












