कणकवली (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवे याने अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
अकोला येथील मूर्तिजापूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व अकोला क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तर्फे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विशेष म्हणजे, आराध्य याने यापूर्वी तालुका, जिल्हा आणि विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्येही सुवर्णपदक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले होते.
राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्याने कास्य पदक पटकावले आहे. आराध्यचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच सचिव भालचंद्र कुळकर्णी, कोषाध्यक्ष सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले. आराध्य गोडवे आयडियल इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. तसेच गेली दोन वर्षे नगरवाचनालय हॉल येथे सुरु असलेल्या मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमी मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण तो घेत आहे. आराध्यच्या या यशामुळे सिंधुदुर्गच्या क्रीडा वर्तुळातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.












