हृदयविकारग्रस्त बालकांसाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; आमदार प्रमोद जठार यांची शिबिराला भेट

मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियेची सुविधा; सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून बालकांना आर्थिक मदत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञ तपासणी शिबिराला आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.

या शिबिराच्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदयाची तपासणी करण्यात येत असून, हृदयविकाराने ग्रस्त आढळणाऱ्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बालकांवर ठाणे येथील नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व उपचारांचा खर्च ट्रस्टच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.

तसेच शस्त्रक्रियेच्या कालावधीत बालकांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने प्रत्येक बालकाला ३ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी शिबिराची माहिती घेत आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाच्या उपचारात अडथळा येऊ नये, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम अनेक गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे, अमेय मराठे, डॉ. विद्याधर तायशेठे, डॉ. श्रीनिवास, नगराध्यक्ष संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!