विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणार !

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत; सेवासंकल्प अभियानातील उत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी गुणवत्ता आणि कलागुण आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करू शकतात. चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून निश्चितपणे प्रोत्साहन आणि सहकार्य दिले जाईल,’’ अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.

सेवासंकल्प अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २३) जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कामत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच कला, वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांनाही वाव मिळाला पाहिजे. लहान वयातच व्यासपीठावर येऊन बोलण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि अन्य उपक्रमांतही सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.’’ त्यांनी स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले.

सभापती प्रितेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून व्यक्त झालेल्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून देश, समाज आणि स्वप्नातील भारताविषयीचे विचार प्रभावीपणे मांडले आहेत. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी स्पर्धांच्या आयोजनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवासंकल्प अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी पाच गटांतून प्रथम तीन क्रमांकांसाठी एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाषणांचे व्हिडिओ तयार केल्याने त्यांना वक्तृत्वाबरोबरच ध्वनिचित्रमुद्रण आणि प्रभावी सादरीकरणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे मान्यवरांनी कौतुक केले. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!