कणकवली (प्रतिनिधी) : येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडीझुडपांमुळे आणि गवतामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. या वाढलेल्या झाडीमुळे वळणावर समोरील वाहन न दिसल्याने अपघातांचा धोका वाढला होता. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते रुजाय फर्नांडिस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तात्काळ ही झाडी तोडण्याची आग्रही मागणी केली होती.
या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक दखल घेतली असून, कळसुली येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत आणि झाडे कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नव्हते. यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता होती आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते. रुजाय फर्नांडिस यांनी ग्रामस्थांच्या या समस्येला वाचा फोडली आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे आता रस्ता मोकळा आणि सुरक्षित झाला असून, संभाव्य अपघातांचा धोका टळला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न रुजाय फर्नांडिस यांच्या पाठपुराव्यामुळे सुटल्याने स्थानिक ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.












