पाऊस पडला की बाजारपेठ बनते चिखलाचा तलाव; प्रशासनाला जाग कधी येणार? शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांचा सवाल
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण बाजारपेठेतील चिखलाची समस्या ऐरणीवर आली असून, पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी यायचे की चिखलातून मार्ग काढायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
खारेपाटण ही पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. परिसरातील अनेक गावांमधून नागरिक खरेदीसाठी येथे येत असतात. मात्र, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने बाजारपेठेतील रस्त्यांवर चिखल साचतो. परिणामी, संपूर्ण परिसराला चिखलाच्या तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पादचाऱ्यांना चालणे कठीण होत असून, दुचाकीस्वारांनाही वाहन चालवताना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची यामुळे गैरसोय होत आहे.
या परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही होत आहे. दुकानांसमोर चिखल साचल्याने ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. बाजारपेठेतील अस्वच्छ आणि गैरसोयीच्या वातावरणामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी उपस्थित केला आहे.
बाजारपेठेचा विकास करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न सुटणार नसून, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन बाजारपेठेची पाहणी करावी व व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोळसुलकर यांनी केली आहे.
एकीकडे विकासाच्या चर्चा सुरू असताना खारेपाटणच्या मुख्य बाजारपेठेला चिखलाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? प्रशासन एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल व्यापारी आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.













