पिंगुळीतील उपोषणावरून दादा साईल, केशव नारकर यांचा विरोधकांना सवाल; वैभव नाईक राजकीय स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप
आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी यापूर्वी दोन वेळा बैठका आयोजित करून संबंधित प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विरोधकांनाही चर्चेसाठी निमंत्रित केले होते. मात्र, त्यावेळी बैठकीला उपस्थित राहण्याचे सौजन्यही न दाखविणारे विरोधक आता उपोषणाच्या माध्यमातून राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. खरोखरच तलावाच्या प्रश्नाबाबत एवढे गांभीर्य होते, तर आमदारांनी बोलाविलेल्या बैठकांना अनुपस्थित का राहिलात, याचे उत्तर विरोधकांनी जनतेला द्यावे, असा सवाल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल आणि कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर यांनी केला. माजी आमदार वैभव नाईक हे विकासकामांमध्ये सहकार्य करण्याऐवजी जनतेची दिशाभूल करून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आंदोलनाचा आधार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दालनात मंगळवारी (ता. ३) दुपारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत साईल आणि नारकर यांनी पिंगुळी पाझर तलावाच्या प्रश्नासह माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनींच्या प्रश्नावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण उपस्थित होते. साईल आणि नारकर म्हणाले, ‘‘पिंगुळी येथील पाझर तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. या तलावातील गाळ काढणे, सौंदर्यीकरण करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि पाणीसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी संबंधित प्रशासनाला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. तलावाच्या पाण्यावर ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून आवश्यक सुविधा निर्माण करता येतील का, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.’’
तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरही आमदार राणे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. संबंधित रस्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात जाणारा असून, त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडविण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित विकासकाला देण्यात आल्या आहेत. तलावाचे संरक्षण, स्थानिकांचे हित आणि विकास यांचा समन्वय साधण्याची भूमिका आमदारांनी घेतली आहे. तरीही विरोधकांनी गेल्या आठवडाभरापासून आंदोलनाची भूमिका स्वीकारली असून, आता उपोषण सुरू केले आहे. उपोषणापूर्वी त्यांनी प्रशासनाशी नेमकी कोणती चर्चा केली, कोणते प्रश्न मांडले आणि त्यावर काय उत्तरे मिळाली, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
पिंगुळी परिसरातील जमिनी परप्रांतीयांनी लुटल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. मात्र, हा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा नारकर यांनी केला. ते म्हणाले, ‘‘स्थानिक जमीनमालकांनी आपल्या जमिनी संबंधित खरेदीदारांना किंवा विकासकांना विकल्या आहेत. कोणाचीही जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतलेली नाही. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना परप्रांतीयांनी जमिनी लुटल्याचे स्वरूप देऊन जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणे चुकीचे आहे. वैभव नाईक दहा वर्षे या भागाचे आमदार होते. त्यातील काही काळ ते सत्तेतही होते. त्या काळात हे प्रश्न त्यांच्या निदर्शनास का आले नाहीत? त्यावेळी परप्रांतीयांच्या कथित अन्यायाबाबत त्यांनी आवाज का उठविला नाही?’’
पिंगुळी परिसर औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने या भागातील विकासाला मोठ्या संधी आहेत. गेल्या दोन वर्षांत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विद्युत रोहित्रे, पाणीपुरवठा, रस्ते आणि उद्योगांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या भागात मालवाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. पिंगुळीतील विद्युत कार्यालयाकडून पुढे जाणाऱ्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. महामार्गावरील वडगणेश परिसरापासून पिंगुळी म्हापसेकर तिठा व गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठीही आमदारांनी प्रयत्न केले आहेत, असे नारकर यांनी सांगितले. वैभव नाईक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर साटेलोट्याचे आरोप केले आहेत. मात्र, दहा वर्षे आमदार असताना त्यांनी याच अधिकाऱ्यांमार्फत जनतेचे प्रश्न का सोडविले नाहीत, असा सवालही करण्यात आला. ‘‘आपल्या कार्यकाळात जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्यामुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने नाईक यांना नाकारले. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही मुद्दा पुढे करून आंदोलन करायचे आणि राजकीय प्रसिद्धी मिळवायची, अशी त्यांची भूमिका दिसते,’’ अशी टीकाही करण्यात आली.
पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळीसह संपूर्ण कुडाळ परिसराच्या विकासाला चालना मिळत आहे. स्थानिक ठाकर समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नांवरही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी विकासकामांमध्ये अडथळे आणण्याऐवजी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘आकारीपडचा प्रश्न सुटला; नाईकांना श्रेयाचे राजकारण सुचले!’ माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनींचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाही माजी आमदार वैभव नाईक श्रेयाचे राजकारण करीत असल्याचा आरोप साईल आणि नारकर यांनी केला. माणगाव खोऱ्यातील सुमारे ३६ गावांपैकी २९ गावांमध्ये हा प्रश्न प्रलंबित होता. प्रत्यक्ष जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात असल्या, तरी सातबारा उताऱ्यावर ‘सरकारी आकारीपड’ अशी नोंद असल्याने मालकीहक्काचा प्रश्न निर्माण झाला होता. आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे १९८७ च्या शासन निर्णयानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या नावे जमिनी होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नामुळे तब्बल १ हजार ४४४ शेतकरी अनेक वर्षे अडचणीत होते. आमदार निलेश राणे यांनी आमदार होण्यापूर्वीपासूनच या प्रश्नाचा पाठपुरावा केला. आमदार झाल्यानंतर संबंधित अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही हा प्रश्न मांडला. न्यायालयीन लढ्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि पुरावे मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत सहकार्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील याचिकाकर्ते प्रमोद उर्फ राजू शेटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत न्यायालयीन लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या पाठपुराव्याची जोड मिळाली. त्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे, लोकप्रतिनिधींचे आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
‘‘दहा वर्षे आमदार असताना वैभव नाईक यांना आकारीपड जमिनींचा प्रश्न सोडविता आला नाही. आता आमदार निलेश राणे यांच्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लागत असल्याने त्यांना श्रेयाचे राजकारण सुचले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय नाकारण्यातच त्यांना अधिक रस आहे,’’ अशी टीका नारकर यांनी केली.
पिंगुळी पाझर तलाव असो किंवा आकारीपड जमिनींचा प्रश्न, स्थानिक नागरिकांचे हित जपून विकासकामे करण्याचीच भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतली आहे. विरोधकांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि विकासाला सहकार्य करावे, असे आवाहन साईल व नारकर यांनी केले.










