३० नोव्हेंबरपर्यंत निबंध सादर करण्याचे आवाहन
श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा आयोजित स्पर्धा; ‘पाणी हेच जीवन’ विषयावर लेखनाची संधी
आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य विकसित व्हावे, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पाण्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा यांच्या वतीने आचरा पंचक्रोशीतील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भावना मुणगेकर, मुंबई आणि श्रीमती मिथिला नेरुरकर, पुणे यांनी प्रायोजकत्व दिले आहे.
‘पाणी हेच जीवन’ हा निबंधाचा विषय असून, निबंधाची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ३०१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २५१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी २०१ रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी १०१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धकांनी निबंधावर स्वतःचे नाव लिहू नये. निबंधासाठी संदर्भ म्हणून वापरलेल्या पुस्तकांची नावे निबंधासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपला निबंध पोस्टाने किंवा इतर व्यक्तीमार्फत न पाठवता स्वतः श्री रामेश्वर वाचन मंदिर येथे आणून द्यावा.
निबंध सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेच्या आयोजनात आवश्यक बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राखीव आहेत.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत (सकाळी १० ते दुपारी ४) ग्रंथपाल विनिता कांबळी यांच्याशी ०२३६५-२४६०१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री रामेश्वर वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.










