वैभववाडीत नाचणी खरेदी केंद्राला मंजुरी;

वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२६-२७ मध्ये वैभववाडी येथे नाचणी खरेदी केंद्र सुरू करण्यास जिल्हा समन्वय समितीने मंजुरी दिली आहे. वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत हे केंद्र सुरू करण्यात येणार असून, नाचणी खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ‘रागी’ हा कमोडिटी प्रकार जोडून देण्याची मागणी जिल्हा पणन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या मुंबई येथील प्रधान कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने नाचणी विक्रीची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा पणन कार्यालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या प्रधान कार्यालयाला पाठविले आहे. या पत्रात वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या मागणीपत्राचा तसेच शासनाच्या १५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत नाचणी खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाने हंगाम २०२६-२७ साठी आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पणन अधिकारी यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेनुसार वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने नाचणी खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार वैभववाडी येथे नाचणी खरेदी केंद्र सुरू करण्यास जिल्हा समन्वय समितीने मंजुरी दिली आहे. या केंद्रासाठी वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाची उपअभिकर्ता संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये आधारभूत दर
जिल्हा समन्वय समितीच्या मंजुरीनुसार वैभववाडी येथील नाचणी खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल ५,२०५ रुपये या शासकीय आधारभूत दराने नाचणी खरेदी करण्यात येणार आहे. पत्रातील माहितीनुसार, नाचणी खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचा कालावधी १ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ असा नमूद करण्यात आला आहे. नाचणी खरेदीचा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान, हंगाम २०२६-२७ साठी धान खरेदीकरिता शासनाचे PC-1329 हे आयडी कार्यान्वित आहे. मात्र, नाचणी खरेदी केंद्राला जिल्हा समन्वय समितीची मंजुरी मिळाली असली, तरी अधिकृत खरेदी पोर्टलवर ‘रागी’ हा कमोडिटी प्रकार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा पणन कार्यालयाने संबंधित प्रधान कार्यालयाकडे पोर्टलवर ‘रागी’ कमोडिटी जोडून देण्याची विनंती केली आहे.

पोर्टलवरील नोंदीनंतर खरेदी प्रक्रियेला गती
नाचणी खरेदी केंद्राला मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किंमत योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यासाठी अधिकृत पोर्टलवर नाचणीची नोंद होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. पोर्टलवर आवश्यक कमोडिटी उपलब्ध झाल्यानंतर वैभववाडीतील मंजूर केंद्रामार्फत नाचणी खरेदीची प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे.

error: Content is protected !!