सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा प्रारंभ…!

कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक प्रगतीची नवी पहाट; विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची निसर्गरम्य पर्यटन राजधानी मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात एक सुवर्ण अध्याय जोडला जात आहे. सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई (SDW – NMI) या बहुप्रतिक्षित व ऐतिहासिक हवाई मार्गावरील प्रत्यक्ष प्रवासाचे अधिकृत बुकिंग आता FLY91 या विमान कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सर्व प्रमुख ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्सवर पूर्णपणे सुरू झाले आहे. या मार्गावर १६ नोव्हेंबर २०२६ पासून सकाळच्या सत्रात नियमित विमान उड्डाणे सुरू होणार आहेत. 

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या हवाई मार्गाची मागणी पूर्णत्वास आणण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात अग्रगण्य ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत पर्यटन व्यावसायिक महासंघाने पालकमंत्री नितेश राणे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय हवाई वाहतुकीचे विशाल केंद्र (International Aviation Hub) साकारत असल्याने, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आणि देशातील कानाकोपऱ्यातील पर्यटकांना थेट सिंधुदुर्गात येणे अत्यंत सुलभ व वेगेवान होणार आहे. मुंबई-नवी मुंबईतून रस्ते व रेल्वे प्रवासात जाणारा तासनतासांचा वेळ वाचल्याने पर्यटकांना कमी वेळेत सिंधुदुर्गाचा आनंद घेता येईल.परदेशी पर्यटकांसाठी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यामुळे सिंधुदुर्गातील ऐतिहासिक किल्ले, नयनरम्य समुद्रकिनारे, स्कूबा डायव्हिंग आणि स्थानिक संस्कृती पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पर्यटकांचा ओघ वाढेल.

मुंबई व नवी मुंबई ही देशाची आर्थिक आणि व्यापारी केंद्रे असल्याने या थेट संपर्काचा मोठा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणार आहे.मुंबईतील उद्योजक व व्यापाऱ्यांना सिंधुदुर्गात पर्यटन व इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे सोयीचे ठरेल.पर्यटकांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक वाहतूकदार, गाईड्स, काजू-आंबा व्यावसायिक आणि हस्तकला कलाकारांच्या व्यवसायात मोठी वाढ होईल.नवीन व्यवसाय आणि पर्यटनाच्या विस्ताराने स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडलेली ‘रिव्हर्स मायग्रेशन’ (उलट स्थलांतर) ही अत्यंत दूरदृष्टीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही विमानसेवा सर्वात मोठा आधार ठरणार आहे.

रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांत गेलेला कोकणातील तरुण वर्ग आता आपल्या मूळ गावी परत येऊन पर्यटन, आदरातिथ्य (Hospitality) आणि स्थानिक व्यापारात स्वतःचे उद्योग उभारू शकेल.स्वगावीच सन्मानजनक रोजगार, उत्तम सुविधा आणि मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यामुळे तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबून गावातच आर्थिक समृद्धी येईल.सिंधुदुर्ग चिपी विमानतळ (SDW) ➔ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMI)  विमान सेवा पुरवठादार FLY91 च्या संपूर्ण टीम चे अभिनंदन ज्यांनी सेवा प्रारंभ करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे.

error: Content is protected !!