कणकवली (प्रतिनिधी) : मूळचे आयनल गावठाणवाडी येथील आणि सध्या जाणवली येथील शिक्षक कॉलनीत राहणारे गणेश अशोक साटम (वय ३२) यांचे रविवारी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश साटम हे काही कामानिमित्त ‘मनोहर शिल्प’ जवळ आले होते. त्या दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तेथील जागरूक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल आयनल आणि कणकवली परिसरात गाढ शोक व्यक्त केला जात आहे.












