सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन व निसर्ग प्रेमी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने फराळ वाटप व आर्थिक मदत!
आचरा (प्रतिनिधी) : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील गरजू व निराधार व्यक्तींच्याही चेहऱ्यावर फुलावा, या सामाजिक भावनेतून सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन, कणकवली यांच्या वतीने फोंडाघाट येथील स्नेहशिंधू आश्रमात फराळ वाटप व आर्थिक मदत करण्यात आली.
निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने रविवार ८ नोव्हेंबर रोजी आश्रमासाठी अन्नदान व आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिवाळीचे औचित्य साधून सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी आश्रमातील निराधारांना दिवाळीचा फराळ वितरित केला. तसेच अनिल कांबळी यांनी आश्रमाच्या मदतीसाठी पाच हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली.
यावेळी निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुशील परब, फाऊंडेशनचे खजिनदार रविकिरण शिरवलकर, सचिव अनुज कांबळी, संचालिका प्रतीक्षा कांबळी, सिद्धेश कांबळी, मनीषा मिठबावकर, पवन सावंत, अशोक नारकर, प्रवीण म्हापसेकर, म्हापसेकर मॅडम, यशवंत भोसले, भोसले मॅडम, उदय शिरोडकर, चेतन शिरोडकर, अनुजा सावंत, परब सर, ओम परब, आराध्य परब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेचे तालुकाध्यक्ष दत्तगुरू गावकर यांनी केले, तर दीपा गावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निराधारांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.











