वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाकडून डायलिसिस सेंटर चालविण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान गेल्या काही महिन्यांपासून प्राप्त झाले नसल्याने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा अडचणीत आली आहे. सध्या सेंटरकडे केवळ आठ दिवस पुरेल इतकेच वैद्यकीय साहित्य उपलब्ध असल्याने या कालावधीत शासनाचे अनुदान प्राप्त न झाल्यास पुढील शनिवारपासून डायलिसिस सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही सेवा बंद झाल्यास तालुक्यातील डायलिसिसवर अवलंबून असलेल्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी वैभववाडीबाहेर धाव घ्यावी लागणार असून, त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नोव्हेंबर २०२४ मध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले. दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच डायलिसिसची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली. शासनाने या सेंटरचे कामकाज एच. एल. हेल्थ केअर या खासगी कंपनीकडे सोपविले आहे. कंपनीमार्फत येथे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून रुग्णांना नियमित डायलिसिस उपचार दिले जात आहेत.
तालुक्यातच सुविधा मिळाल्याने रुग्णांना मोठा दिलासा
डायलिसिससाठी आठवड्यातून अनेक वेळा रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील रुग्णांना ओरोस,कोल्हापूर, गोवा यांसारख्या ठिकाणी जावे लागत असल्याने वेळ, प्रवासाचा खर्च आणि रुग्णांच्या प्रकृतीवरील ताण वाढत होता. ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू झाल्याने या रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळू लागले. विशेषतः आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांसाठी ही सेवा मोठा आधार ठरली आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संबंधित कंपनीला शासनाकडून मिळणारे अनुदान प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी डायलिसिस प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले विविध वैद्यकीय साहित्य, औषधे व अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी करताना कंपनीसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आठ दिवसांचेच साहित्य शिल्लक
सध्या डायलिसिस सेंटरमध्ये उपलब्ध असलेले वैद्यकीय साहित्य केवळ आठ दिवस पुरेल एवढेच असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आठ दिवसांच्या कालावधीत शासनाकडून प्रलंबित अनुदान उपलब्ध झाले नाही, तर सेंटरची सेवा पुढील शनिवारपासून बंद करण्याची वेळ येऊ शकते. सेवा बंद झाल्यास नियमित डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांच्या उपचाराचे वेळापत्रक विस्कळीत होण्याबरोबरच त्यांना अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
शासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी
वैभववाडी हा दुर्गम व ग्रामीण तालुका असल्याने येथील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ अनुदानाच्या विलंबामुळे ही सेवा बंद पडणे रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब ठरणार आहे. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कंपनीचे प्रलंबित अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच डायलिसिस सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.












