मोफत डायलेसिस सेवा खंडित होणार नाही !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनंतर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीसह जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा व दोडामार्ग येथे महाडायलेसीस योजनेंतर्गत किडनीच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा कायम सुरू राहणार आहे. या सेवेसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्य पुरवठा मुबलक उपलब्ध करुन द्या. तसेच सेवा पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तात्काळ अदा करा. सेवे अभावी रुग्णांची गैरसोय नको. अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.     

अनुदाना अभावी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद अशी बातमी प्रसार माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने महाडायलेसिस योजनेचे जिल्हा समन्वयक यांना संपर्क साधक ही सेवा विना खंड सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाडायलेसिस  योजनेंतर्गत मोफत डायलेसिस सेवा पुरविण्यात येत आहे. ही सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीने सेवा पुरविल्याची बिले न मिळाल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा इशारा रुग्णालय प्रशासनाला व रुग्णांना लेखी नोटिशीद्वारे दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी कंपनीच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या डायलेसिस युनिटला पुरविण्यात येणारी आवश्यक औषधे व इतर साहित्याचा साठा पुढील दोन आठवड्यांपुरता उपलब्ध आहे. त्यामुळे या कालावधीत डायलेसिस सेवा सुरू राहणार आहे.
दरम्यान, डायलेसिस सेवा पुरविणाऱ्या संबंधित कंपनीला शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेतून केवळ २५ टक्के रक्कम कॉर्पस फंडासाठी वजा करून उर्वरित पूर्ण रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून रुग्णालय प्रमुखांना कार्यालयीन पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच संबंधित कंपनीची थकीत देयके तातडीने अदा करण्याबाबत शासनस्तरावर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाडायलेसीस योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णालयांमधील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!