श्री सद्गुरू नारायण महाराज दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष; दिंडीसोबतच्या वाहतूक वाहनासाठी पोलीस व टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथील श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष आहे. यानिमित्त १० नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथून पंढरपूरच्या दिशेने दिंडी प्रस्थान करणार आहे. या पायी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच दिंडीसोबतच्या साहित्य वाहतूक वाहनाला मार्गात अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश नारायण राणे यांनी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या दिंडीसोबत एमडब्ल्यूटी-९६०१ क्रमांकाचे टाटा एलपीटी वाहन नेण्यात येते. प्रमिला लक्ष्मण गंगावणे यांच्या मालकीच्या या वाहनातून वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अन्य आवश्यक सामग्रीची वाहतूक केली जाते. पायी वारीदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक वस्तू वेळेवर उपलब्ध करून देण्याबरोबरच, पायी चालताना थकलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांना गरजेनुसार काही अंतराचा प्रवास करण्यासाठीही या वाहनाचा उपयोग होतो. त्यामुळे दिंडीच्या संपूर्ण प्रवासात हे वाहन महत्त्वाची भूमिका बजावते.
वारीच्या मार्गावर विविध ठिकाणी पोलीस तपासणी आणि टोलनाक्यांवर वाहनांना थांबावे लागते. अशा वेळी दिंडीच्या नियोजनात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि वारकऱ्यांच्या सुविधांवर परिणाम होऊ नये, यासाठी मंत्री नितेश राणे यांनी संबंधित पोलीस यंत्रणा तसेच टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र दिले आहे. या वाहनाला प्रवासादरम्यान आवश्यक ते सहकार्य करून वारकऱ्यांची गैरसोय टाळावी, असे आवाहन त्यांनी या पत्राद्वारे केले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी दिलेले हे शिफारसपत्र भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी ह.भ.प. सावळाराम कुर्ले बुवा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी कीशोर रेवणकर , गजानन कुबल तसेच वारकरी बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीच्या माध्यमातून गेली पाच दशके वेंगुर्ला ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास सुरू आहे. यंदा ५१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या दिंडीच्या प्रस्थानाची वारकरी भाविकांमध्ये उत्सुकता आहे. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिभावाच्या वातावरणात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.











