बांदा (प्रतिनिधी) : निगुडे गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असताना ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालय निगुडे यांच्यावतीने जा.क्र. १७१/२०२६, दि. ०५/११/२०२६ रोजी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, नवकिरण ग्रामसंघ, विशेष ग्रामसभा दि. ०५/१०/२०२६ मध्ये झालेला ठराव आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांचे दि. ०३/११/२०२६ चे पत्र यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
गावात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी केलेली मागणी आणि संताप लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम 52(४) अंतर्गत निर्णय घेण्यात आला आहे.
इमारत क्र. ५९२ ला लागून असलेले दुकान गाळे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता आणि ना हरकत दाखला न घेता बांधण्यात आले असल्याचे ग्रामपंचायतीच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे सदर दुकान गाळे अनधिकृत व विनापरवाना ठरवण्यात आले आहेत
ही नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत सदरील दुकान गाळे स्वतः पाडून टाकावेत, असा आदेश ग्रामपंचायतीने दिला आहे.
या निर्णयाची प्रत माहितीसाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.











