सांगुळवाडीत महिला बचत गटाचे शेतीमाल संकलन केंद्र सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) एकात्मिक शेती समूह (IFC) उपक्रमांतर्गत सांगुळवाडी येथे रमाई स्वयंसहायता समूहाचे शेतीमाल संकलन केंद्र सुरू करण्यात आले. सोमवारी (ता. २३) पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. या उपक्रमासाठी बचत गटाला एक लाख रुपयांचे कर्जस्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोरे नं. २ येथील सह्याद्री महिला प्रभागसंघ व सांगुळवाडी येथील भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक गट तसेच शेतकरी कुटुंबांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाचे एकाच ठिकाणी संकलन, वर्गीकरण, प्रतवारी, वजन, पॅकिंग, साठवणूक आणि बाजारपेठेत विक्री करण्याची सुविधा या केंद्रातून उपलब्ध होणार आहे.

केंद्रात काजू बोंड, काजूगर, आंबा, कोकम, फणस, नाचणी तसेच अन्य भरडधान्यांचे संकलन केले जाणार आहे. आंब्याची प्रतवारी, कोकम संकलन करून प्रक्रिया उद्योगांना पुरवठा, फणस संकलन व प्रक्रिया तसेच काजू बोंड व काजूगर संकलनावर विशेष भर दिला जाणार आहे. महिला उत्पादक गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीची सुविधाही केंद्रातून उपलब्ध होणार आहे. केंद्रासाठी ३०० किलो क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बॅग सीलिंग मशीन, पॅकिंग साहित्य, प्लास्टिक क्रेट्स, गोणपाटाच्या पिशव्या, ताडपत्री तसेच धान्य व काजूतील आर्द्रता तपासणीसाठी मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदीसाठी ४५ हजार रुपयांचे खेळते भांडवल ठेवण्यात आले असून, वाहतूक व विक्री व्यवस्थेसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. एकत्रित संकलन व विक्रीमुळे शेतमाल थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे सुलभ होणार असून, महिला बचत गटाला व्यवसाय व्यवस्थापनाचा अनुभव मिळून आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी निर्माण होणार आहे. उद्घाटनप्रसंगी मंगेश लोके यांनी महिला बचत गटाच्या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांनी एकत्रित प्रयत्नांतून कृषिपूरक व्यवसायांचा विस्तार करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक गुरुप्रसाद तेंडोलकर, ब्लॉक अँकर अनिकेत कदम, सह्याद्री महिला प्रभागसंघाच्या अध्यक्षा उमा मंगेश कदम, सचिव शिल्पा शंकर सुतार, कोषाध्यक्ष पूजा पंढरी रावराणे, भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुरेखा सुरेश गुरव, सचिव संजना सत्यवान सुतार, रमाई स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा दीपिका दीपक जाधव, सचिव स्वाती सचिन जाधव, कोषाध्यक्ष श्वेता सुधीर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार, ग्रामसेवक विद्याधर सावंत, ग्रामसखी शमा सुतार, प्रभागसंघ लिपिका सुप्रिया रावराणे तसेच रमाई स्वयंसहायता समूहातील महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!