वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग स्वतंत्र कार्यालय मंजूर
पालकमंत्री नितेश राणे यांनी मागणी करताच राज्य शासनाने दिली मंजुरी
महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष बांधकामावर नियंत्रण आणि क्षेत्रीय स्तरावर समन्वय राहणार
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता प्रशासकीय स्तरावर अधिक गती मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामावर प्रभावी नियंत्रण, नियमित देखरेख आणि प्रशासकीय समन्वय राखता यावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम प्रक्रियेला अधिक बळ मिळणार असून, जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात ४२७.५६ कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १ लाख ८१ हजार १४९.७३ चौरस मीटर आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यात ८१ हजार २६३.३६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित असून त्यासाठी ६२५.९४ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
या मोठ्या प्रकल्पाच्या कामाचे प्रशासकीयदृष्ट्या योग्य वाटप, प्रत्यक्ष बांधकामावर प्रभावी नियंत्रण आणि क्षेत्रीय स्तरावर समन्वय साधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी संबंधित उपविभागाचे कार्यालय ओरोस येथे स्थलांतरित करण्याची मागणी पुढे आली होती. त्याला आता शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.
‘उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वैद्यकीय महाविद्यालय), सिंधुदुर्गनगरी (ओरोस)’ अशी पदस्थापना या कार्यालयाला देण्यात आली असून कणकवली येथे या विभागाकडे असलेल्या मंजूर पदांसह स्थलांतर होणार आहे. शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.
यापूर्वी हे कार्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांच्या अंतर्गत कार्यरत होते. आता ते अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आले असून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे.
दरम्यान, या नवीन कार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम प्रकल्पांवर स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय मार्गी लागल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला बळ मिळणार आहे.












