तिथवलीतील दोन शाळांमध्ये संविधान जागृती कार्यशाळा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तिथवली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर (प्राथमिक शाळा) आणि श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल (माध्यमिक शाळा) येथे संविधान जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘भारतीय संविधान समजून घेऊया – जबाबदार नागरिक बनूया!’ या संकल्पनेवर आधारित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संविधान, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती देण्यात आली.

MEERA चे अध्यक्ष गुलजार काझी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय संविधानाची निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार व कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था, सामाजिक न्याय, समानता आणि बंधुता आदी विषयांवर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये समजावून सांगण्यात आली.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, प्रश्नोत्तरे व विविध कृतींच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांची माहिती देण्यात आली. तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीतील नागरिकांची भूमिका, अधिकार व कर्तव्यांचा परस्परसंबंध तसेच अन्यायाविरुद्ध घटनात्मक मार्गाने दाद मागण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानाची मूलभूत मूल्ये विद्यार्थ्यांनी आचरणात आणावीत. अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवून प्रत्येकाने सुजाण, संवेदनशील व जबाबदार नागरिक बनावे, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

यावेळी तिथवली केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश सुतार, गणेश टकले, दीप्ती सावंत, अजिंक्य पोकळे , सचिन झाटे, श्री पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने कार्यशाळा उत्साहात पार पडली.

error: Content is protected !!