वेंगुर्ले (प्रतिनिधी) : नोव्हेंबर महिन्यातील मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे आयोजित केलेल्या ‘रंगमंच खुणावतोय’ या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात रंगलेल्या कट्ट्याच्या या सलग मासिक त्रेहात्तराव्या कार्यक्रमात आठ सदस्यांनी विविध नाटकातील स्वगते सादर केली.
या कार्यक्रमाची संकल्पना शब्दांकुर प्रोडक्शनचे कमलेश अणावकर यांची होती. त्यांनी सादर केलेल्या प्रदीप दळवी लिखित मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातील स्वगताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानी प्रमोद जोशी लिखित एका स्वप्नगर्भाचा मृत्यू या एकांकिकेतील प्रवेशही सादर केला. श्रद्धा राऊळ यांनी
पु.ल.देशपांडे यांच्या सुंदर मी होणार नाटकातील स्वगत सादर केले. पायल गावडे हिने बाबांचं प्रेम व्यक्त करणारं एक अप्रतिम स्वगत सादर केलं आणि सुप्रिया नाईक हिने सादर केलेलं शिक्षणाविषयीचं स्वगत ही छान झालं. राजेश मोंडकर या युवा कलाकाराने विपूल महापुरुष लिखित गेट वेल सून दामले या नाटकातील स्वगत दमदारपणे रंगवलं. रवी पणशीकर या अष्टपैलू कलाकाराने वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट नाटकातील दोन स्वगते उत्तमरित्या सवेष सादर केली. प्र.के. अत्रे लिखित तो मी नव्हेच या नाटकातील सरकारी वकिलाचे आक्षेप भालचंद्र दीक्षित यांनी, तर लखोबा लोखंडेची कैफियत राजेश वैज यांनी उत्स्फुर्तपणे सादर केली. पूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शक कमलेश अणावकर यांच्या वसंत कानेटकर लिखित रायगडला जेव्हा जाग येते या नाटकातील प्रवेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिलीप पांढरे यांचेकडून सर्व कलाकारांना २०२७ ची कालनिर्णय दिनदर्शिका भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले, तर आभार ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी मानले.
कार्यक्रमाला अरुण धर्णे, सरोज रेडकर, नम्रता राय अनिता सौदागर, एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, रामचंद्र बेहेरे, जयदीप देशपांडे, गीता धर्णे, तन्वी ओटवणेकर, प्रकाश मिसाळ, उदय पार्सेकर, प्रमोद पार्सेकर, भाग्यश्री मुद्रस, लीना परब आणि प्राची पालयेकर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.












