आजचे जिज्ञासू विद्यार्थी हेच उद्याचे संशोधक – प्र.मुख्या- ए.पी.घुले
कासार्डे माध्य- उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न
तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. नारकर पुरस्कृत शालेय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून कु. प्रिती क्षिरसागर हिने सादर केलेल्या ‘वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी’ या प्रतिकृतीने, तर माध्यमिक गटातून सर्वेश सतीश कदम याने सादर केलेल्या ‘वॉटर कन्झर्वेशन’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला.
आजचे जिज्ञासू विद्यार्थी हेच उद्याचे संशोधक – प्र.मुख्या- ए.पी.घुले
विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासेने पाहण्याची आणि नवकल्पना शोधण्याची प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून केवळ गुण मिळविण्यापेक्षा प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि नवनिर्मितीची जिद्द जोपासावी. आजचे जिज्ञासू विद्यार्थी हेच उद्याचे संशोधक, शास्त्रज्ञ आणि देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक ए. पी. घुले यांनी केले. ते विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सौ.आर.आर.सरवणकर, पी. जे. काळे,डी. जे. मारकड, ए.ए.काणेकर,विज्ञान विभागप्रमुख सौ.सविता जाधव आदीसह इतर शिक्षक उपस्थित होते.
विज्ञान कोपऱ्याचे उद्घाटन
दरम्यान विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून विज्ञान कोपऱा या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
विज्ञान विभागप्रमुख सौ.सविता जाधव यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रतिवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ शिक्षिका सौ.आर. आर. सरवणकर यांनी बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा शालेय विज्ञान प्रदर्शनांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी प्रतिकृती
इयत्ता ९ वी ते १२ वी गट : प्रथम – सर्वेश सतीश कदम (वॉटर कन्झर्वेशन), द्वितीय – ऋक्षराज रामदास घुगे (रॉकेट लॉन्चर), तृतीय – मोहम्मद नौशाद हरकुडे (जल वितरण यंत्र).
इयत्ता ६ वी ते ८ वी गट : प्रथम – कु. प्रिती शिवराज क्षिरसागर (वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी), द्वितीय – चिन्मय दीपक रहाटे (ओम सिक्युरिटी सिस्टीम), तृतीय – रिहांश भावकू पाऊसकर (भूकंप सूचक प्रतिकृती).
या विज्ञान प्रदर्शनात ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या होत्या.
प्राथमिक गटासाठी डी.डी. मिठबांवकर व सौ. एस. एस. पेडणेकर, तर माध्यमिक गटासाठी डी. एम. पवार व एन.सी. कानकेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागप्रमुख सौ. एस. एम. जाधव,डी. डी. मिठबांवकर, डी. बी. देवरुखकर, व्ही. व्ही. मुद्राळे, डी. एम. पवार, सौ. एस. एस. पेडणेकर, प्रियंका सुतार, स्वप्निल वाळके, डी.इ.धोंड, एन. सी. कानकेकर आदी विज्ञान शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली पेडणेकर यांनी केले, तर आभार डी. डी. मिठबांवकर यांनी मानले.












