कोकणचे शिलेदार संघाच्या वतीने दुर्ग खारेपाटण वरती पहिल्यांदाच ३०० मशाली प्रज्वलित करून साजरा केला मशाल महोत्सव

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कोकणचे शिलेदार संघाचा विशेष पुढाकार

तळेरे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत उभारण्यात आलेल्या दुर्ग खारेपाटण किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या किल्ल्याचे महत्व लक्षात घेऊन हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कोकणचे शिलेदार संघाने विशेष पुढाकार घेतला आहे.

‌‌खारेपाटण किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सर्वदूर पोहचविण्यासाठी आणि त्या किल्ल्याला दूर्गप्रेमींनी भेट देऊन हा वारसा जपला जावा यासाठी कोकणचे शिलेदार संघाच्या युवक युवतींनी विशेष पुढाकार घेऊन या किल्ल्याला नवी झळाळी देण्यासाठी अथक परिश्रम सुरू केले आहे. दुर्लक्षित असलेला खारेपाटण किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून झाडा झुडपात लुप्त झालेला होता. या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था पाहून शिवप्रेमी तरुण-तरुणींनी हा वारसा जपण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन किल्ल्याच्या परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. त्यामुळे झाडी झुडपाचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे किल्ल्यावर जाण्याच्या पायऱ्या आणि पायवाटा बंद झाल्या होत्या. तो पायवाटेचा जंगलमय भाग पूर्णपणे साफ करून हा ऐतिहासिक वारसा जपला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे आणि छत्रपतींनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचा वारसा अभेद्य रहावा यासाठी तरुण पिढी पुढे सरसावली आहे. महाराजांच्या प्रेरणेतून हा इतिहास पुन्हा जागृत झाला आहे. खारेपाटण किल्ल्याचे महत्व आणि त्याचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी या किल्ल्याच्या तटबंदीवर ३०० मशाली प्रज्वलन करून संपूर्ण दुर्ग मशालीच्या उजेडाने प्रकाशित करण्याचा संकल्प करून हा मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम कोकणचे शिलेदार आयोजित शिव शंभु विचार मंच व ग्रामपंचायत खारेपाटण व ग्रामस्थ ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. तसेच हिंदवी प्रतिष्ठान राजापूर यांनी सुद्धा सोहळ्याला हातभार लावून या शिवकार्यात खारीचा वाटा उचला. कणकवली पोलीस दलाने सुद्धा संपूर्ण कार्यक्रमाला चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

ह्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गडदेवता पुजन खारेपाटणचे प्रतिष्ठीत नागरीक आणि मंदिर समितीचे अध्यक्ष मधुकर गुरव ह्यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच इतर मान्यवरांमध्ये भूषण साटम, संजय शिंदे तसेच कोकणचे शिलेदार संघ व हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे प्रमुख पदाधिकारी व शिवरायांचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर गड पूजन शिव शंभू विचार मंचचे कोकण प्रांत अध्यक्ष जयदीप देसाई, भूषण साटम, मधुकर गुरव, कोकणचे शिलेदार संघातून दुर्गसेवक- सेविका, हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे अध्यक्ष महेश मयेकर व इतर मान्यवर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक वेळी महाराजांच्या शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

त्यानंतर गडाचा इतिहास सांगणाऱ्या म्हणजेच विरगळी ह्या ठिकाणच्या त्या अमर विरांची आठवण करून त्या विरगळीची पूजा करण्यात आली. विरगळ पुजन शिव शंभु विचार मंच कडून करण्यात आले. भूषण साटम, संजय शिंदे, जयदीप देसाई, विजय देसाई, जेष्ठ पत्रकार उदय दुधवडकर, संजय खानविलकर व कोकणचे शिलेदार संघातून दुर्गसेवक व हिंदवी प्रतिष्ठान राजापूर मधून दुर्गसेवक यांनी केली. त्यानंतर दुर्ग सेवकांनी मशाल फेरीच आयोजन करून खारेपाटण गावाचे ग्राम दैवत रवळनाथ मंदिर मध्ये नारळ वाढवून मुख्य मशाल प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर खारेपाटण बस स्थानकावरून गारद देऊन मशाल दुर्ग खारेपाटण नेण्यात आली. तद्नंतर किल्ल्यावरती मशाली पेटवून भव्य सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे पेटत्या मशालींमुळे संपूर्ण किल्ल्याचा परिसर मशाल ज्योतींनी झळाळून गेला होता. याप्रसंगी कणकवली बिडवाडीच्या दुर्गसेविकांनी आपले मर्दानी धाडसी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली.

याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल आणि फोटो फ्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सगळ्यात जास्त गडकिल्ले मोहिमा करणारा दुर्गसेवक कु.साहिल गुरव याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेवटी मान्यवर, ग्रामस्थ, दुर्गप्रेमी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून खारेपाटण किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दुर्ग मावळ्यांनी राबविलेल्या या मशाल महोत्सवात स्थानिक ग्रामस्थ, विविध संघटना व राजकीय पदाधिकारी यांचा मात्र म्हणावा तसा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग दिसला नाही. किमान यापुढील काळात तरी किल्ल्यावरती आयोजित कार्यक्रमामध्ये खारेपाटणची अस्मिता असलेल्या किल्ले खारेपाटण किल्ल्याचा वारसा जपण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व राजकीय पदाधिकारी यांनी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचे महत्व ओळखून ही अस्मिता जपली पाहिजे. तसेच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

error: Content is protected !!