गोवा बनावटीची १३ हजारांची दारू जप्त!
सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. सातार्डा चेकपोस्ट आणि सावंतवाडीतील सालईवाडा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १३ हजार ३८० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई काल सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास सातार्डा चेकपोस्ट येथे करण्यात आली. यावेळी फिलिस मोतेस डिसोजा (वय ७७, रा. वरचीवाडी, सातार्डा) याच्याकडे गोवा बनावटीच्या गोल्डन एसी ब्ल्यूफिन व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या २० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. सुमारे दोन हजार रुपये किमतीचा हा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथे करण्यात आली. संदीप कृष्णा वेंगुर्लेकर (वय ४६, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याच्याकडे ११ हजार ३८० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. या दारूचा साठा नेल्सन फर्नांडिस याने आणून दिल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ८१ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांतील संबंधित आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. या दोन्ही कारवाया सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केल्या असून, पुढील तपास सुरू आहे.












