क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर विभागातून निवड
आचरा (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील कला शिक्षक, सुप्रसिद्ध रांगोळीकार समीर अशोक चांदरकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय विशेष कलाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर विभागातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षणासोबतच कला क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समीर चांदरकर यांच्या कार्याचा शासनस्तरावर गौरव झाल्याने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या पुरस्कारामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून शैक्षणिक, सामाजिक व कला क्षेत्रातून समीर चांदरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.












