समृद्धी महामार्गावर बस धडाधडा पेटली, बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

(ब्युरो न्युज) : बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ही आग भीषण होती. आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते.

error: Content is protected !!