दुसऱ्यांचे राजकीय वस्त्रहरण करणारा संजय राऊत आज वस्त्रहीन झाला
भाजपा आमदार नितेश राणेंचा तुफानी हल्ला
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपा सोबत सत्तेत जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी वर्षभरापूर्वी लेखी पत्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. स्वतःला सिल्व्हर ओक च्या जवळचा समजणाऱ्या आणि स्वतःला महाविकास आघाडीचा मोठा नेता समजणाऱ्या संजय राजाराम राऊत ला एवढी मोठी घडामोड कशी समजली नाही ? स्वतः शरद पवार म्हणतात की 2024 मध्ये नरेंद मोदी पंतप्रधान होणार. दुसऱ्यांचे वस्त्रहरण करत फिरणारा संजय राऊत आज स्वतः वस्त्रहीन झाला आहे. दुसऱ्यांना राजकीय दलाल म्हणणारा संजय राजाराम राऊत हाच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दलाल असून सध्या राजकीय बेरोजगार झाला आहे अशा कडवट शब्दांतून तुफानी हल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आजच्या पत्रकार परीषदेत केला. प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी सांगितल्यानुसार संजय राऊत याची महाराष्ट्राच्या राजकारणात आता कवडीमोल किंमत राहिलेली आहे. राऊत याची राजकीय बेरोजगारी झालीच आहे पण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या बळावर राऊत चे घर आणि धंदे चालतात ती राष्ट्रवादी काँग्रेसही आता भाजपसोबत असून राज्यात सत्तेत भागीदार आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावणार आहे हे राऊत उघड्या डोळ्यांनी बघ. संजय राऊत ची अवस्था नसबंदी झाल्यासारखी आहे. आज अजित पवार प्रफुल्ल पटेल याना वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ केल्याची भाषा करणारा संजय राऊत कालपर्यंत महाविकास आघाडी आणि पटना येथील बैठकीत त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला होता.तेव्हा वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यासारखे वाटले नाही ? आता राज्याच्या राजकारणात ना संजय राऊत ला किंमत राहिली ना त्याच्या मालकाला आणि मालकाच्या मुलाला राहिली अशा शब्दांत आ.नितेश राणेंनी ठाकरे पितापुत्रावरही हल्ला चढवला.बाळासाहेबांचं घर फोडण्याची, पवारांचे घर फोडण्याची सुपारी घेतलेल्या संजय राऊत च्या भावाला ही 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे पिसाळ हे पराभूत करणार. त्यामुळे ना भावाकडे आमदारकी राहणार ना स्वतःकडे खासदारकी राहणार. स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाणार हेच संजय राऊत चे राजकीय भवितव्य आहे. पत्रकारांनी राज आणि उद्धव एकत्र येणार काय असे विचारल्यावर राऊत उठून गेला यावरून संजय राऊत राज आणि उद्धव याना एकत्र येऊ देणार नाही हे त्यांच्या समर्थकांनी ओळखले पाहिजे.जोपर्यंत संजय राऊत ची मुस्कटदाबी करत नाही तोवर हा कोणाच्याच कामाचा राहिलेला नाही अशी टीकाही नितेश यांनी केली.












