पावशी घावनळे बॉक्सवेलमध्ये पाणी साचण्याचा प्रश्न जैसे थे

पाणी काढण्यासाठी डांबरी रस्त्यावर चर मारल्याने पावशी सरपंच,उपसरपंच आक्रमक

महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कुडाळ (अमोल गोसावी) : मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ शहरानजीक असलेल्या पावशी घावनळे बॉक्सवेल मध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रश्न अजून जैसे थेच आहे. या बॉक्सवेलचा भाग सखल असल्याने पाऊस आल्यानंतरयाठिकाणी चारही बाजूने पाणी येउन बॉक्सवेल मध्ये गुडघाभर पाणी साचते याचा वाहनचालकांना तसेच खास करून चालत ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान काल मंगळवारी दुपारी महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच तसेच नागरीकांना विश्वासात न घेता सदर बॉक्सवेल मधील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी लगतच्या डांबरी सबवे असलेल्या रस्त्यावरच जेसीबी च्या साहाय्याने चर खोदण्याचे काम सुरू केले होते. ही बाब समजताच पावशी सरपंच वैशाली पावसकर , उपसरपंच लक्ष्मीकांत तेली आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण आणि इतर स्थानिक रहिवाश्यांनी त्याठिकाणी येत रस्त्यावरील चर खोदाईचे काम थांबवले आणि खोदलेला चर पाण्यामुळे दिसला आणि जर एखाद्याचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल करत महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. आणि खोदलेला चर लगेच बुजवण्यास सांगितले. तसेच योग्य नियोजन करून सर्वप्रथम बॉक्सवेल मध्ये येणारे पाणी थांबण्यासाठी उपाययोजना करा आणि गेली तीन वर्षे सातत्याने भेडसावणारा हा प्रश्न तातडीने मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.

error: Content is protected !!