ऑनलाईन अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री सन्मान योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित

तहसील स्तरावर लँडशेडिंग प्रक्रिया करून गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना प्रलंबित लाभाची रक्कम वितरित करा

मनसेकडून कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ (अमोल गोसावी) : अलीकडेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये परराज्यातील लाभार्थी आढळल्याने शासन स्तरावरून पडताळणी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. प्राथमिक पडताळणी प्रक्रियेत काही साशंकित लाभार्थ्यांना अपात्र ठरवून देय लाभ वसुलीची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावरून प्रस्तावित करण्यात आली आहे.

किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील काही स्थानिक पात्र लाभार्थ्यांचे खाते शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन अर्जातील सदोष माहिती भरणामुळे “इन ऍक्टिव्ह” मोडवर जाऊन कायमस्वरूपी अपात्र ठरण्याच्या मार्गावर असल्याकडे लक्ष वेधत माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखालील मनसे पदाधिकारी व शेतकरी शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी श्रीम ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी किसान सन्मान योजनेचा लाभ प्रलंबित राहण्यामागे शासकीय यंत्रणा कशाप्रकारे कारणीभूत आहे अशा तांत्रिक बाबींकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. एकाच ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या एका पेक्षा अधिक महसुली गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती सदोष भरली गेल्याने ते तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरले जावून त्यांना वितरित होणारीं लाभाची रक्कम थांबवण्यात आल्याचे पुराव्यासाहित उघड करण्यात आले.

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अशा पद्धतीने बहुतांश लाभार्थी “इन ऍक्टिव्ह” मोडवर गेले असल्याने अशा लाभार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलवरील माहिती वेळीच अद्ययावत न झाल्यास ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरून त्यांच्यावर वसुलीची कार्यवाही होण्याची शक्यता असल्याने अशा स्थानिक “इन ऍक्टिव्ह” खातेदार शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रस्तावांमधील चुका तत्काळ दुरुस्त करून तहसील स्तरावर लँड शेडिंग प्रक्रिया करण्यात यावी व अशा लाभार्थ्यांची प्रलंबित रक्कम गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावी अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे मनसेकडून करण्यात आली आहे. अशा इन ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची यादी तपासून तात्काळ लँड शेडिंग कार्यवाही करण्याची ग्वाही प्रांताधिकारी काळुसे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी बाबल गावडे, राजेश टंगसाळी, दीपक गावडे, वैभव धुरी, अविनाश अणावकर, सतीश कदम, जगन्नाथ गावडे, रामा सावंत, नायब तहसीलदार प्रदीप पवार यासंह अनेक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!