कलश व मुर्ती मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी ; गुढ्या, रांगोळ्यांनी सजला काळसे गाव
चौके (अमाेल गाेसावी) : मालवण तालुक्यातील काळसे गावातील श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा आणि श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मुर्ती मूर्तीस्थापना सोहळ्यास आज गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी पासून दिमाखात सुरुवात झाली. यानिमित्त संपूर्ण मंदिर आतून बाहेरून फुलांनी सजवण्यात आले आहे. पहाटेपासून धार्मिक विधी पुरोहितांच्या मंत्रघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर कलश तसेच श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मुर्ती यांची भव्य दिव्य अशी ढोलताशांच्या गजरात माऊली मंदिर ते रवळनाथ मंदिर – लिंगेश्वर मंदिर – सातेरी मंदिर आणि पुन्हा माऊली मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान रस्ताकडेला ठिकठिकाणी गुढ्या उभारून आणि रांगोळ्या काढून संपूर्ण गावात कलश मिरवणूकीचे स्थानिक महिला पुरूष ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. या भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघाला. कलश मिरवणुकीत गावातील सुवासिनी पारंपरिक वेशात तुळशी वृंदावन आणि कलश डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या तसेच अबालवृद्ध भाविक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सदर मिरवणूकी दरम्यान कै. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठान यांच्या वतीने मिरवणुकीतील सर्व भाविकांना होबळीचा माळ येथे मोफत शीतपेय वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी पहाटे ७ वाजल्यापासून श्री देवी माऊलीची विधीवत पूजा आणि पुरोहितांच्या उपस्थितीत माऊली मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. यावेळी अनिल विनायक प्रभुं व अनघा अनिल प्रभु,प्रकाश नारायण प्रभु व प्रियांका प्रकाश प्रभु, विजय दत्ताराम परब व विजया विजय परब,उमेश विनायक प्रभु,समिता उमेश प्रभु,राजीव प्रमोद परब व सोनल राजीव परब. या पाच यजमान जोडप्यांच्या हस्ते गणेश पूजन, पुण्याहवाचन,मातृकापूजन,ब्राम्हणपूजन, स्थापित देवता,६४ योगिनी, वास्तु क्षेत्रपाल सर्वतोभद्र मंडळ प्रधान देवता पूजन करण्यात आले. त्यानंतर प. पू. स्वामी विपाप्मानंद यांचे मंदिरात आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत धान्यादिवास, शय्यादिवास आदी धार्मिक विधी पार पडले.
दुपारनंतर कै.विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानच्या प्रियांका प्रशांत परब,हरमीत प्रतिक परब आणि कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. सायंकाळी वारकरी भजन आणि स्थानिक भजनांचा कार्यक्रम पार पडला . दिवसभराचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी, श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी , सर्व गावकरी , मानकरी , पालटदार , ग्रामस्थ आणि तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.














