फोंडाघाट (प्रतिनिधी) : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन करून भूजलस्तर वाढविण्याच्या उद्देशाने फोंडाघाट-मारुतीवाडी येथे उगवाई नदीवर जलसंधारणांतर्गत पहिल्या वनराई कच्च्या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमात सरपंच सौ. संजना आग्रे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी वर्गाने प्रत्यक्ष श्रमदान करत सहभाग नोंदविला.
गावातील जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा बंधारा उभारण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, सीआरपी, अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत बंधारा उभारणीसाठी श्रमदान केले.
बंधाऱ्याच्या उभारणीनंतर उगवाई नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, लगतच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पाणीसाठ्यामुळे भूजलपातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी व अन्य जलस्रोतांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जलसंधारणाच्या कामात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेला पुढाकार गावासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, आगामी काळातही लोकसहभागातून अशा प्रकारच्या जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.












