देवगड येथे “आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत” कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी योजना उपक्रमा अंतर्गत दिनांक २८ऑगस्ट २०२३ रोजी मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे,ता.देवगड येथे नुकतीच शेतकरी व्यवसायीक,महीला बचत गट प्रतिनिधी कृषी सहकारी संस्थाच्या प्रतिनिधीची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत खुरकुटे, नोडल अधिकारी – SMART- (आत्मा ), अजय थुटे,जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड, मेश्राम – जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, दिया जाधव – डीआरपी, अस्मिता जाधव – तालुका व्यवस्थापक, माविम चे – आदित्य घाडी,एचडीएफसी बँक देवगडचे – विवेक शहारे,युको बँक,देवगड आणि दिनेश काकतकर,विदर्भ कोकण बँक,मुटाट आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत कृषी विषयी योजनेची सविस्तर माहिती अंतर्गत उद्दिष्ट, पात्र लाभार्थी, व्याज सवलत, पतहमी,पात्र प्रकल्प,योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती सादरीकरणा द्वारे देण्यात आली. तसेच काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करणेस प्रोत्साहन देऊन एकूणच कृषी पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणुकीची सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेत प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी पात्र आहे. या योजनेत एकूण रुपये दोन कोटी पर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत सात वर्षांपर्यंत देण्यात येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने www.agriinfra.dac.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.या बाबतची सविस्तर माहिती खुरकुटे,नोडलअधिकारी – SMART (आत्मा) यांनी या कार्यशाळेत दिली. तसेच अजय थुटे,जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड यांनी अन्नधान्याची प्रक्रिया करणेसाठी ही योजना निर्माण केली आहे तसेच कृषी पायाभूत सुविधा योजनेचे महत्त्व विषद करून महिला बचतगट,शेतकरी उत्पादक गट,वैयक्तिक शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले. मेश्राम,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,बँक ऑफ इंडिया यांनी ८जुलै २०२० पासून पुढे घेण्यात आलेल्या कृषी उदयोग कर्जावर ३% व्याजात सवलत मिळणेची पद्धत आणि इतर योजनेतून व्याजात सवलत मिळत असेल तरी या योजनेतून फायदा घेणेबाबत उपस्थितांना अवगत करून बँकेशी संदर्भात अडचणी बाबत शंका समाधान केले. तसेच दिया जाधव, जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना संदर्भात माहिती दिली. उपस्थित सर्व बँकेचे अधीकारी यांनी आपली ओळख करून देऊन सम्पूर्ण सहकार्य करणेत येईल असे मनोगत व्यक्त केले. कैलास ढेपे,तालुका कृषि अधिकारी, देवगड यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतांना या योजनेचे महत्त्व आणि सदरच्या योजनेचा लाभ इतरांनाही मिळणेकरिता प्रचार, प्रसिद्धी करणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन निकेतन राणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,आत्मा यांनी केले. या कार्यशाळेत या योजनेशी संबंधित असलेले उद्योजक,महिला बचतगट,शेतकरी उत्पादक कंपनी,इ.उत्सुक लाभार्थी तसेच कृषि विभागाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!