मालवण (प्रतिनिधी) : आचरा पिरावाडी येथील हेमलता उध्दव कुबल यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणाला मासेमारी जाळे लावून ठेवण्यात आले होते. पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी झाडाचं नुकसान होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या जाळ्यात काल सहा फूट लांब अजगर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शी सौ. आदिती खामकर – कुबल यांनी पाहिल्यावर त्यांचे दीर संतोष शांताराम कुबल यांना सांगितले. त्यांनी पाहताच अजगर काही हालचाल करतं नसल्याने तो मरणासन्न असावा म्हणून जाळे कापण्यास सुरूवात केली असता अचानक अजगराने अंग झटकले. आणि उपस्थितांची तारांबळ उडाली. दरम्यान नजिक असलेले सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडून जीवदान दिले. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यासाठी दोनशे कुबल कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आलेले होते. त्यांनी अखेर निःश्वास सोडला. तसेच बरोबर एक वर्षांपूर्वी याचं ठिकाणी नागराज अवतरले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणी चर्चांना उधाण आले आहे.